

बेळगाव : तुम्ही देव आणि त्या देवाच्या पुजाऱ्याने सांगितलेले भविष्य मानत नाही, तर तुम्हाला गावात राहण्याचा अधिकार नाही. शिवाय, अशा कुटुंबाशी कोणीही संबंध ठेवू नये, ठेवल्यास किंवा त्यांच्याशी कोणी बोलल्यास पाच हजारांचा दंड व बोलल्याची माहिती दिल्यास त्याला १ हजाराचे बक्षीस देऊ, असा अजब फतवा तालुक्यातील कॉडसकोप्प गावातील एका कुटुंबाने त्यांच्या नातेवाईक कुटुंबांविरोधात काढला होता. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोंडसकोप्प गावात विठ्ठल बिरदेव मंदिर आहे. या मंदिराचा पुजारी भविष्य सांगतो. परंतु, रेणुका नरसोबा सांबरेकर (वय २४, रा. कोंडसकोप्प) व त्यांच्या कुटुंबीयांनी या पुजाऱ्याच्या भविष्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.
तथापि, सांबरेकर यांच्या भाऊबंदकीतील काही लोकांनी या नकाराला आक्षेप घेतला. तसेच, तुम्हीं देवाला मानत नाही व भविष्य मानत नाही. तुम्ही देवाचा भंडारा स्पर्श करा. तीन महिन्यांत तुमच्या बाबतीत काही अघटित घडणार किंवा घरातील कोणीतरी मृत पावणार, असे म्हणत या कुटुंबाला भंडाऱ्याला स्पर्श करण्यास भाग पाडले. शिवाय, असे काही घडले तर तुम्हाला एक लाखाचा दंड केला जाईल, अशी भीतीही या कुटुंबाला घातली.
....म्हणून बहिष्काराचा फतवा भविष्य मानण्यास नकाराच्या घटनेला तीन महिने झाले असून, कुटुंबाला काहीही त्रास झाला नाही. त्यामुळे सांबरेकर यांच्या भाऊबंदकीला राग आला. त्यामुळे त्यांनी रेणुका यांच्या कुटुंबावर बहिष्काराचा फतवा काढला. रेणुका व तिच्या कुटुंबीयांशी कोणीही संपर्क ठेवू नये, त्यांच्याशी कोणी बोलू नये, तसे केल्यास संबंधिताला ५ हजारांचा दंड आकारला जाईल. शिवाय, बहिष्कृत कुटुंबीयांमधील सदस्यांशी कोणी बोलताना आढळला व याची माहिती दिल्यास त्याला एक हजारचे बक्षीस दिले जाईल, असे जाहीर केले.
पंधरा दिवसांनंतर एफआयआर जेव्हापासून रेणुका यांच्या कुटुंबावर बहिष्कार घातला गेला, तेव्हापासून सांबरेकर कुटुंबीयांना कोणीही समारंभ, यात्रा-जत्रेला बोलावणे बंद केले. कोणत्याही कामाला बोलावणेही ग्रामस्थांनी बंद केले आहे. शिवाय, रेणुका यांच्या भाऊबंदांनी रेणुका व त्यांच्या सासूला अर्वाच्य शिवीगाळ केली. शिवीगाळ सुरूच होती. ही माहिती रेणुका यांच्या कुटुंबाने आधी पोलिसांना दिली होती. परंतु, त्यांनी एफआयआर करून घेतला नसल्याचे सांगितले. जाते. परंतु 'पुढारी सह काही काही माध्यमांनी हा प्रकार प्रकाशात आणल्यानंतर आता एफआयआर झाला असून, १ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'या' नऊजणांवर गुन्हा बहिष्कारप्रकरणी रेणुका सांबरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये मल्लाप्पा विठ्ठल सांबरेकर, वैजू विठ्ठल सांबरेकर, पिराजी विठ्ठल सांबरेकर, रमेश विठ्ठल सांबरेकर, यल्लाप्पा विठ्ठल सांबरेकर, विठ्ठल गणपती सांबरेकर, भागण्णा यल्लाप्पा सांबरेकर, माळींग भरमा सांबरेकर, गंगाप्पा निगाप्पा सांबरेकर, (सर्वजण रा. कोंडसकोप्प) यांचा समावेश आहे.