बेळगाव : शहरातील शास्त्रीनगर परिसरात होणारा बालविवाह अक्का पथकाने रोखला. काही दिवसांपूर्वी त्यांनी वंटमुरी कॉलनीतील बालविवाह रोखला होता. त्यामुळे, अक्का पथक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
अक्का पथक गस्तीवर असताना शास्त्रीनगरमध्ये बुधवारी (दि. २९) एक विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. पथकातील सदस्यांनी मुलीच्या घरी भेट दिली असता रिना (नाव बदलले आहे) नामक मुलीचे लग्न मुडलगीतील एका तरुणाशी लावण्यात येत असल्याचे समजले.
पथकाने मुलीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता ती अवघी १३ वर्षांची असल्याचे आढळून आले. त्यामुळे, महिला पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर व अन्य विभागाच्या सहकाऱ्यांनी हा बालविवाह केल्यास तुमच्यासमोर कायद्याच्या कोणत्या अडचणी येऊ शकतात, याची माहिती कुटुंबाला दिली. त्यांना मुलीचे लहान वयात लग्न करण्याचे काय तोटे असतात हे सांगून हा बालविवाह होऊ दिला नाही. सदर युवतीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. शिवाय युवतीच्या वडिलांवर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.