

बेळगाव :
मखर सजले, फुले गंधाळती
गणरायाच्या आगमनाची
उत्सुकता सार्या आसमंती...
चैतन्य निर्माण करणार्या मंगलमूर्ती गणरायाचे बुधवारी (दि. 27) ढोल- ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आगमन होणार आहे. विघ्नहर्त्या बाप्पांचे स्वागत करण्यासाठी आबालवृद्ध सज्ज असून मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. चार दिवसांप्रमाणे बुधवारी पावसाची उघडीप राहिल्यास बाप्पांच्या आगमन सोहळ्यातील उत्साह वाढणार आहे.
बुधवारी गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी दोन वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी? ? प्रात:कालापासून माध्यान्हापर्यंत कोणत्याहीवेळी गणेश प्रतिष्ठापना व पूजा करता येते.
गणेश पुराणानुसार गणरायाचा जन्म चतुर्थीतिथी आणि चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजेच दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता. माध्यान्ह गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी 11.05 ते दुपारी 1.40 पर्यंत असणार आहे. यंदा गणेश चतुर्थीला अनेक शुभयोग जुळून येत आहेत. रवि योग, धनयोग, लक्ष्मी नारायण योग, गजकेसरी योग, शुभ योग आणि आदित्य योग यांचा समावेश आहे. सार्वजनिक मंडळांच्या श्रीमूर्तीचे सात दिवस आधीपासूनच आगमन सुरू आहे.
बुधवारी सार्वजनिक गणेश मंडपात प्रतिष्ठापना करण्याची लगबग दिसणार आहे. दोन दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे सजावट सुरू आहे. घराघरांतही गणेशभक्तांनी आरास केली आहे. गणरायाच्या विविध रूपांतील मूर्ती मूर्तीशाळेत सज्ज आहेत. यंदा गणेशोत्सवाच्या परंपरेत हालते देखावे, भव्य श्रीमूर्तीच्या दर्शनापासून गणेशभक्तांना आनंददायी माहोल अनुभवता येणार आहे.
बुधवारी श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गुरुवारी 28 रोजी ऋषिपंचमी, रविवारी 31 रोजी गौरी आवाहन, सोमवारी 1 रोजी गौरी पूजन, तर मंगळवारी 2 रोजी गौरी विसर्जन आहे. शनिवारी 6 रोजी अनंत चतुर्दशी आहे. यंदा गणेशोत्सव अकरा दिवसांचा आहे.