

बेळगाव ः वस्तू बनलेली असते एका कारणासाठी; पण तिचा वापर दुसर्या कारणासाठी केला तर ते जीवघेणे ठरते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. बेळगावच्या आझमनगरमध्येही अशीच घटना घडली असून, झुरळ मारण्याचे औषध कोल्ड्रिंकच्या बाटलीत भरून ठेवण्यात आले होते. मात्र, त्याची कल्पना नसलेल्या दोन बालिकांनी ते कोल्ड्रिंकच समजून पिल्याने एका बालिकेचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी अत्यवस्थ आहे. दुर्दैवी घटनेची एपीएमसी पोलिसांत नोंद झाली आहे.
अकीलअहंमद तल्लूर यांची अडीच वर्षांची मुलगी मरीयम मंगळवारी, 12 ऑगस्टरोेजी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांच्या घराच्या समोरील घरात राहात असलेली तिची मैत्रीण जुनेशा हिच्यासोबत खेळायला गेली होती. दोघी खेळत असताना त्यांना बाजूलाच ठेवलेली एका नामांकित कंपनीची शीतपेयाची बाटली दिसली. कोल्ड्रिंक समजून दोघींनीही त्यातील द्रव प्राशन केला. यानंतर काही वेळातच दोघींनाही अत्यवस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने केएलई रुग्णालयात नेले. परंतु, मरीयमचा बुधवारी मृत्यू झाला. दुसरी बालिका जुनेशा हिच्यावर उपचार सुरू आहेत.