

निपाणी : पुढारी वृत्तसेवा
मुरगूड रोडला लागून असलेल्या नरसोबानगर कोडणी हद्दीत गायकवाडी येथे एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर शॉर्टसर्किटमुळे लगतच्या दुकानातील आणखी चार सिलिंडरचा स्फोट होऊन सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी, निपाणीपासून तीन किमी अंतरावर गायकवाडी हद्दीत काही व्यावसायिकांनी दोन वर्षांपासून दुकाने सुरू केली आहेत. यामध्ये निपाणी येथील बाळू सांगले यांची ज्योतिर्लिंग चिरमुरे भट्टी व हॉटेल तसेच प्रतीक सांगले यांचे चहाचे दुकान, मधुकर नलवडे यांचे चायनीज सेंटर तर बूदलमुख येथील आनंदा तेली यांचे भांडी केंद्र अशी चार दुकाने एकमेकाशेजारी लागून आहेत. सोमवारी रात्री 10 नंतर दुकानमालक दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर प्रथम चायनीज सेंटरमधील गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी शॉर्टसर्किट होऊन दुकानांना आग लागली. यामध्ये एकूण पाच सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीची तीव्रता वाढू लागली. बघता बघता आगीने सर्वच दुकानांना वेढले.
जवळच असलेल्या गायकवाडी येथील स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दुकान मालकांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. निपाणी, कागल हमीदवाडा, चिकोडी येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर 25 कर्मचार्यांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र घटनेत सर्व साहित्य जळून खाक झाले. चिरमुरे व हॉटेलमधील खाद्यपदार्थ तसेच खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य, भांडी, तसेच 4 ते 5 हजार रोकड असे एकूण 15 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी तहसील, ग्राम तलाठी व हेस्कॉम विभागाच्या अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली चारही दुकाने निपाणी-मुरगूड रोडला लागून असल्याने या काळात दोन्ही बाजूने होणारी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांसह स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीच्या घटनेनंतर काही वेळ या परिसरात पाऊस झाल्याने आग आटोक्यात येण्यासाठी मदतीचे ठरले.