

धारवाड : गावात फक्त 14-15 घरे, लोकसंख्या सुमारे शंभरावर, दुग्धव्यवसाय हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने लोकांपेक्षा गुरेढोरे जास्त असलेला मडकीकोप्प हे धारवाड जिल्ह्यातील छोटासे गाव विकासापासून वंचित आहे. याच गावाला विठ्ठल इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. राजन देशपांडे यांनी दत्तक घेतल्याने हे गाव चर्चेत आला आहे.
मडकीकोप्प? ? गाव जिल्हा मुख्यालयापासून 33 किमी अंतरावर आहे. ते इतके गरीब आहे की ग्रामस्थांच्या घरांना दरवाजे आणि खिडक्याही नाहीत. या दुर्लक्षित गावच्या आणि रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. राजन देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील विठ्ठल बाल आरोग्य संस्थेने गाव दत्तक घेतले आहे. 2010 मध्ये डॉ. देशपांडे यांना मडकीकोप्प गावात आरोग्य तपासणी शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले होते. संपर्काचा अभाव आणि इतर समस्यांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. यानंतर त्यांना या गावासाठी काहीतरी करावे, असे वाटू लागले. यानंतर ही संधी विठ्ठल बाल आरोग्य संस्थेचा रौप्यमहोत्सव साजरा करत असताना आली.
सनशाइन नावाचा हा प्रकल्प गावचा समग्र विकास, आर्थिक उन्नती, दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता, आरोग्य, सामाजिक परिवर्तन आणि इतर गोष्टींसाठी आहे. काही दिवसापूर्वी डॉ. देशपांडे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. गाव दत्तक घेतल्यानंतर आरोग्यसेवेपासून सुरुवात करण्यात आली. पुढच्या टप्प्यात ग्रामस्थांना योग्य घरे बांधून देणार असून निसर्ग आणि शिक्षणाशी असलेले नाते अबाधित ठेवले जाणार आहे. समस्या विचारण्यासाठी आणि त्यावर उपाय सांगण्यासाठी कुणीतरी आले आहे, याचा आनंद झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. ही संस्था आम्हाला सुविधा पुरवेल, अशी अपेक्षाही ते करत आहेत.
पारंपरिक झोपडीचे सौंदर्य जपणे
टेकड्यांतील पाणी खंदकाद्वारे वळवणे
प्रत्येक घरासाठी शौचालये व बाथरूम बांधणे
स्वच्छ पाण्याच्या टाक्यांची तरतूद
धूरविरहित बर्नरचे वितरण
प्रत्येक घरात मोबाईल चार्जिंग युनिटसह सौरप्रकाश व्यवस्था
घरांच्या बाह्य भिंती कलात्मकपणे रंगवणे