

अंकली : किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यावर वार करून खून केल्यानंतर तो अपघात दाखवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर गोकाक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकगीत गायक मारुती अडव्याप्पा लठ्ठे (वय 27) असे मृताचे नाव आहे. रायबाग पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत येणार्या बुदिहाळ येथे दुचाकी व कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. सिद्राम वडियार (रा. बुदिहाळ) व अक्षय पुजारी (रा. जोडकुरळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य संशयित रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताब्यात घेतल्यावर याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली असून, खूनप्रकरणी एकूण 11 जणांची नावे नोंद आहेत.
मारुतीला मित्रांनी फोन करून वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले. बोलताना फोनवर त्याच्याशी अश्लिल भाषेचा वापर केला होता. त्यामुळे चिडलेला मारुती त्यांना भेटण्यासाठी बुदिहाळ गावाजवळच्या रस्त्यावर येऊन थांबला होता. पार्टीला बोलावणारे मित्र तिथे पोचल्यानंतर वादावादी झाली. त्यात 11 जणांनी मारुतीवर हल्ला चढवून डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर दुचाकी व कारचा अपघात झाल्याचे दाखविण्यात आले. पण मारुतीच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून खून झाल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून दोघा संशयितांना अटक केली आहे.
मृत मारुतीच्या कुटुंबीयांनी 11 जणांवर खुनाचा संशय व्यक्त केला आहे. रायबागचे सीपीआय मंटूर, अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुत्नाळे पुढील अधिक तपास करत आहेत.