

चिकोडी : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असलेल्या इंदिरा कँटीनचे भाग्य चिकोडी शहराला कधी मिळणार, याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागून आहे. जिल्हा केंद्राच्या पातळीचे शहर असूनही येथे एकही इंदिरा कँटीन सुरू नाही. विशेष म्हणजे येथे दोन इंदिरा कँटीनच्या इमारती बांधून पूर्ण झाल्या असूनही त्यातील एकही सुरू नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ कधी मिळणार, असा सवाल करण्यात येत आहे.
बेळगावनंतर अनेक तालुक्यांत आजही इंदिरा कँटीनची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक तालुका केंद्रांत इमारती झाल्या असूनही त्यांचे उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे या इमारती असूनही नसल्यासारख्या अवस्थेत आहेत. काही इमारती पूर्ण झाल्या असून त्या आता अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्या आहेत. चिकोडीतील एका इमारतीचा वापर अवैध धंदे करण्यासाठी होत असल्याचे अलीकडेच उघडकीस आले आहे. तरीही जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केेलेले आहे. चिकोडी शहरात पहिल्यांदा तहसील कार्यालयाजवळ जागा निश्चित केली होती; पण, त्यानंतर पुन्हा जागेत बदल करण्यात आला. सरकारी रुग्णालयांत येणाऱ्या गरीब रुग्णांसह बसस्थानक परिसरात हे कँटीन असावे, अशी मागणी झाल्याने सध्या हेस्कॉम कार्यालयालाजवळ इंदिरा कँटीनसाठी इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत पूर्ण झाली आहे. तसेच पहिली मागणी असलेल्या ठिकाणीही आणखी एक इंदिरा कँटीन मंजूर झाले असून चिकोडी विभागाची मुख्य प्रशासकीय इमारत असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाजवळ ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे.
दुसरी इमारत अडगळीत
दुसऱ्या कँटीनची निर्मिती झाली असली तरी ती जागा योग्य नसल्याचा आरोप अनेकदा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तरीही ही इमारत आता बांधून पूर्ण झाली आहे. निपाणी-मुधोळ मार्गावर बसव सर्कलपासून नागरमुत्रोळी रस्त्यावर असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मुख्य संरक्षक भिंतीच्या आत या इमारतीचे काम झाले आहे. ही इमारत संरक्षक भिंतीच्या आत असल्याने ती रस्त्यावरून येणाऱ्यांना दिसणार नाही. त्यामुळे या कँटीनच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याशिवाय येथे चार शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होणार असल्याचा आरोप होत आहे.