

बेळगाव ः शहरात प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व रिक्षांना येत्या दोन महिन्यांच्या आत मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी (दि. 7) दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीत शहरातील प्रवाशांच्या वाढत्या तक्रार आणि भाडेवाढीच्या अनियमिततेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या बेळगाव शहरात सुमारे 11 हजार रिक्षा कार्यरत असून, सर्व रिक्षांनी मीटरनुसारच प्रवास करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले.
मीटर बसवण्याची प्रक्रिया गुरुवारपासूनच (दि. 8) गतीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून दरमहा किमान 3 हजार रिक्षांना मीटर बसवून त्यावर प्रशासनाचे अधिकृत स्टिकर लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी मीटर बसवण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप अनेक रिक्षांनी नियमांचे पालन केलेले नसल्याने आता उर्वरित सर्व रिक्षांनी दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. बैठकीला पोलिस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन, जिल्हा अतिरिक्त पोलिसप्रमुख आर. बी. बरसगी, महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह परिवहन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.