

बेळगाव : हलगा- मच्छे बायपास रस्त्यासाठी जमीन हिसकावून घेतल्याने धसका घेतल्याने शेतकऱ्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. नागेंद्र मल्लाप्पा मऱ्याक्काचे (वय 83, रा. हलगा) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवार दि. 1 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
दहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नी देवाक्का यांचाही याच तणावातून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नागेंद्र यांचाही मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बायपासने आणखी एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा बळी घेतल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हलगा-मच्छे बायपासमधे आपली जमीन जाणार हे कळल्यावर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. 2019 पासून ते शेताकडे जातो, म्हणून दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करत किंवा आपल्या शेतात जाऊन बडबडत बसत होते. गेल्यावर्षी घरात कोणालाही न सांगताच ते बाहेर पडले होत. घरातील मंडळींनी शोधाशोध केली. त्यावेळी बस्तवाड येथील शिवारात ते निपचित होऊन पडले होते. बायपासमधे जमीन गेल्यानंतर त्यांच्या दुसरीकडे असणाऱ्या जमिनीत हेस्कॉमने उच्च दाबाच्या वीजवाहिन्या घालण्यासाठी मोठे खांब उभारले आहेत. पदरात असलेली शेतजमीन गेल्यामुळे जगावे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. याच तणावातून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.