

बेळगाव : केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेने सिमेंटवरील 28 टक्के जीएसटीवरुन 18 टक्के जीएसटी कमी केला आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार आहेच, शिवाय घरकुल बांधणार्यांना अधिक दिलासा मिळाला आहे. प्रतिबॅग सिमेंट आता 25 ते 30 रुपये स्वस्त होणार आहे. सध्या 320 ते 340 असा दर असून बेळगाव शहर व उपनगरात महिन्याला सुमारे 8 लाख सिमेंट पोत्यांची खरेदी होते. नव्या दरानुसार बेळगावकर ग्राहकांचे महिन्याला 2 कोटी रुपये वाचणार आहेत.
केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत जीएसटी धोरण मंजूर करुन जीएसटी परिषदेंतर्गत 1 जुलै 2017 पासून सिमेंटवर 28 टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत देशभरातील बांधकाम संघटना तसेच क्रेडाईकडूनही सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आता जीएसटी कपातीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव शहर व उपनगराचा विचार करता महिन्याला सुमारे 8 लाख बॅग सिमेंटची आवश्यकता भासते. बेळगाव हे सेकंड होमसाठी प्रसिद्ध शहर आहे.
मूळचे बेळगाव जिल्ह्यातील व आता मेट्रो शहरात राहणारे तसेच शेजारील महाराष्ट्रातील अनेक लोक आपली गुंतवणूक म्हणून सेकंड होम साठी बेळगाव शहराला पसंती देतात. यामुळे येथे बांधकाम क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. येथे महिन्याला आठ लाख पोती इतकी सिमेंटची आवश्यकता भासते. यामुळे महिन्याला सुमारे 2 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. जीएसटीत कपात केल्याने क्रेडाई तसेच इंजिनिअर असोसिएशनतर्फे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बांधकाम क्षेत्रातील सिमेंट हा महत्त्वाचा घटक आहे. गत सात वर्षापासून 28 टक्के जीएसटी लागू आहे. आता 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. हा निर्णय बांधकाम क्षेत्राला दिलासा व ऊर्जितावस्था देणारा आहे. या पुढील काळात सिमेंट उत्पादन कंपन्यांनी दर वाढवू नयेत, एवढीच अपेक्षा.
प्रभाकर देसाई, बांधकाम व्यावसायिक, बेळगाव
सिमेंटवरील जीएसटी दरात कपात करा म्हणून आम्ही क्रेडाईच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत. त्याला आता यश आले आहे. बेळगाव शहर व उपनगरात महिन्याला 8 लाख सिमेंट पोती खरेदी केली जातात. त्यामुळे ग्राहकांचे महिन्याला आता 2 कोटी रुपये वाचणार आहेत.
युवराज हुलजी, अध्यक्ष, क्रेडाई, बेळगाव शाखा