

सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात 10,803 जणांची नियुक्ती
एका गणकासाठी जास्तीत जास्त 150 घरे
प्रत्येक 20 गणकांमागे एक पर्यवेक्षक
बेळगाव : जिल्ह्यात सोमवारपासून (दि. 22) जातनिहाय जनगणनेला सुरुवात झाली. पण, पहिल्याच दिवशी या गणनेला ब्रेक लागला. गणनेसाठी नेमलेल्या शिक्षक व कर्मचार्यांना अॅप डाऊनलोड होत नसल्याने गणना रखडली. तर जिल्हा प्रशासनाकडून आमदार राजू सेठ यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले.
जिल्हाधिकार्यांनी आज तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. मंगळवारपासून गणना सुरळीत होईल, अशी ग्वाही दिली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जात गणना सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात 10,803 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये शिक्षकांसह विविध सरकारी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका गणकासाठी जास्तीत जास्त 150 घरे आहेत. 525 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक 20 गणकांमागे एक पर्यवेक्षक आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सकाळी धर्मनाथ भवनजवळील वड्डरवाडी याठिकाणी आमदार राजू सेट यांच्या हस्ते गणनेचे उद्घाटन केले. पहिल्याच दिवशी गणनेला अडचणी आल्या असून मंगळवारपासून गणना सुरळीत होईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली आहे. जिल्ह्यात सुमारे 12 लाख कुटुंबांचे मागासवर्गीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गणना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये बेळगाव तालुक्यात 3 लाख 25 हजार 560 कुटुंबांचा सर्वे होणार आहे.
सोमवारी सकाळी गणनेला सुरवात होणार होती. पण, शिक्षकांच्या मोबाईलवर अॅप डाउनलोड झाले नाही. अनेकांना गणनेचे लोकेशन मिळाले नाही. त्यामुळे, शिक्षकांना गणनेचे काम करता आले नाही.
राज्यात एकाच वेळी गणनेचे काम सुरू झाल्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या किरकोळ आहेत. त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत. मंगळवारपासून गणनेचे काम सुरळीत सुरू राहणार आहे.
मोहम्मद रोशन, जिल्हाधिकारी