

बेळगाव : बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील अनेक गावांत काही महिन्यापासून सातत्याने चोरी होत आहे. गावाशेजारी असणारी शिवारातील घरे, मंदिरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास होत आहे. गावाशेजारी लहान उद्योगातील किमती उपकरणे, विहिरीवरील विद्युत मोटारी, त्यांच्या वायर्स अशा लाखो रुपयांच्या वस्तूही चोरीला जात आहेत. त्यामुळे बेळगाव व चंदगड पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम राबवून चोरीचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.
बेळगाव, वडगाव येथील रहिवासी व अतिवाड फाटा राज्य हद्दीजवळील जेरोन करवालो यांचे गुरुवारी (दि. 7) मध्यरात्री घर फोडले. दिवसा रेकी करुन घरी कोणीच राहत नसल्याचा अंदाज घेऊन प्रवेशद्वाराचा कुलूप तसेच निवासस्थानाचा कुलून तोडून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. सदरचे चोरटे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहेत. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. गत दोन वर्षात हे घर दुसर्यांदा फोडण्यात आले.
आठ दिवसापूर्वी शिनोळी बुद्रुक येथे गावच्या मध्य वस्तीतील महालक्ष्मी मंदिर फोडून 2 लाख रुपयांचे दागिने चोरले. याच दिवशी अतिवाड फाटा जवळील कल्याणपूर मंदिराची दानपेटी फोडली. आठ दिवसात तुडये येथेही मंदिरात चोरी झाली आहे.
उचगाव फाटा येथील गणेश मंदिरात अनेकवेळा दानपेटी फोडली आहे. तर गोजगा येथील कल्मेश्वर मंदिरातून लाखो रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. लघु उद्योगातील अनेक उपकरणांची चोरी होत आहे. शेतातील विहिरीवरील मोटारी, मोटारीच्या महागड्या वायर्सची चोरी होत आहे. यापूर्वी बेकिनकेरे येथील लहान हॉटेल्स, घरेही फोडली आहेत. वाढत्या चोर्या रोखण्यासाठी रात्री पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक आहे. गावांत ग्राम संरक्षण समित्या स्थापन करून चोर्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. काही शेतकर्यांनी सीसीटीव्ही बसविले आहेत. अनेक वेळा घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकी लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत.