

UPSC Result 2025
मुदाळतिट्टा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालामध्ये यमगे ता. कागल येथील बिरदेव डोणे याने देशात 551वी रँक पटकावत यश मिळवले. या परीक्षेचा निकाल लागून 24 तासाचा कालावधी उलटून गेला तरी बिरदेव कर्नाटकातील बेळगाव येथे बकरी राखण्यात रमून गेला होता. वेळ मिळेल त्यावेळी मेंढी माऊलीची केलेली सेवा व त्यांचा प्राप्त आशीर्वाद यामुळेच आपण या पदाला गवसणी घालू शकलो असे मत बिरदेव डोणे यांनी ‘दैनिक पुढारी’ बोलताना व्यक्त केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बिरदेव डोणे या नूतन अधिकाऱ्याने आपल्या सत्कार समवेत उचलून घेतलेल्या एका मेंढीचा फोटो व त्याचबरोबर त्यांच्या नातलग यांनी केलेला सत्कार हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे. अत्यंत खडतर जीवन असणाऱ्या धनगर कुटुंबात जन्मलेल्या बिरू ने मोठे यश प्राप्त केले. दहावी, बारावी परीक्षेत केंद्रात प्रथम येण्याबरोबरच पुणे येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण करण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी दोन वर्षे केली दोन परीक्षाही त्यांनी दिल्या. तिसऱ्या वेळी त्यालाही यश प्राप्त झाले.
आज निकाल आहे पण किती वाजता लागेल याची माहिती नसणाऱ्या बिरूला त्याच्या मित्राने फोन करून ‘मित्रा जिंकलास तुझं नाव लिस्ट मध्ये आहे’ असा फोन केला. यावेळी बिरु आपल्या बकऱ्यांच्या कातर कामांमध्ये व्यस्त होता. आपल्याला यश मिळालं याचा आनंद त्याला झाला पण काम बाजूला ठेवता येत नव्हतं काम आटोपल्यानंतर आपल्या नातेवाईकांना त्याने ही गोष्ट सांगितली. हजारावर बकऱ्यांचा कळप असणारे ठिकाण आनंद उत्सवाने नाहून गेले. पोरानं कष्टाचं चीज केलं बाबांनी प्रतिक्रिया दिली. सध्या मामा व आपली दोघांची एकत्र असणारी बकरी सांभाळण्याचं काम बिरदेव करत होता. मला सहकार्य करणारे माझे आई-वडील शिक्षक मामा नातलग यांच्यामुळेच मी हे सहज शक्य करू शकलो. असे त्याने म्हटले आहे.
वाचनावर भर दिला. परीक्षेची काळजीपूर्वक माहिती घेऊन अभ्यास केला सामोरे गेलो यश मिळाले. पण मी अजूनही बकऱ्यातच आहे गावातून निरोप येत आहे. गावी कधी येणार विचारपूस केली जात आहे. असे असताना देखील गावी कधी जायचं यावर अजून विचार नाही. निकाल लागून 24 तास पूर्ण होऊन गेले पण अजून आपण बकऱ्यांची सेवा करण्यातच दंग आहात असे विचारले असता माझा हा पारंपारिक व्यवसाय आहे तो सांभाळणे गरजेचे आहे. आज पर्यंत आमचं कुटुंब यावरच अवलंबून आहे त्यामुळे हा व्यवसाय लगेच सोडून मला बाहेर पडणं मुश्कील आहे. माझं मेंढी माऊली वर प्रेम आहे. मी त्यांची आजवर सेवा केली त्यातच फळ यश रुपानं आपल्याला प्राप्त झाल्याचेही बिरदेव डोणे आणि यावेळी सांगितले.