

बेळगाव : तुमच्या मुलाचा खून झाला आहे. तुम्ही बेळगावला या असा पोलिसांचा फोन बिहारच्या खून झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना गेला. ते कसेबसे बेळगावात आले, पण मृतदेह गावाकडे नेण्यासाठी पैसे नव्हते. बेळगावातही अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने ते बिहारचे कुटुंब मृतदेह येथेच ठेवून माघारी फिरल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला. त्यानंतर काकती पोलिस स्थानकाचे अधिकारी व पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
महेशकुमार शंकर पांडे (वय. 34 रा. बिहार) हा कामासाठी होनगा येथील मानविका एंटरप्रायझेस येथे कामाला आला होता. क्षुल्लक कारणातून शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी त्याचा दोन अल्पवयीन मुलांनी डोक्यात रॉड घालून खून करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काप्ती पोलिसांनी उत्तर प्रदेश मधील अलिगड जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलाला तर काकती मधील एका अल्पवयीन मुलाला अटक केली.
काकती पोलिसांनी कायदेशीर सर्व कारवाई केली. मात्र त्यांच्या कुटुंबीयांकडे रुग्णालयाचे पैसे भरण्यासाठी तसेच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे पैसे नसल्यामुळे मृतदेह येथेच ठेवून बिहारला माघारी परतावे लागले आहे.
आपल्या मुलाचा खून झाला हे मोठे दुःख होते. मात्र खिशामध्ये पैशाची दमडी नसल्याने बेळगावला कसे जायचे असा प्रश्न त्यांना पडला. तरीदेखील काही जणांकडून हात उसने घेऊन बेळगाव गाठले. पोटासाठी व आपल्या कुटुंबासाठी अनेक जण घर, गाव, राज्य सोडून परराज्यात कामाला जातात. मात्र त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्या कामगारांना किंवा त्यांच्या कुटुंबावर कसे संकट येते, याची प्रचिती या घटेनतून आली.
कुटुंबीयांनी मृतदेह सोडल्यामुळे काकती पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकार्यांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तसेच रुग्णालयाचे बिलही भरले आहे. माणसाची आर्थिक परिस्थिती आपल्या रक्ताच्या नात्यालाही दूर सारते हे यावरून दिसून येते.