

बेळगाव : एका नऊ वर्षांच्या विशेष मुलाच्या नाकातून आठ दगड, दोन प्लास्टिक खेळणी, प्लास्टिकचे तुकडे काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केएलई संस्थेच्या येळ्ळूर रोडवरील शताब्दी धर्मादाय रुग्णायात करण्यात आली.
एक महिन्यापासून सर्दी, तोंडाची दुर्गंधी, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या या मुलावर केएलईच्या प्रसिद्ध कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. विवेकानंद कोळेकर यांनी उपचार केले. पालकांसोबत आलेल्या मुलाला सुरुवातीला तीव्र वेदना होत होत्या. त्याच्या नाकाची सूक्ष्मदर्शकातून तपासणी केली असता आत काही वस्तू आढळून आल्या. त्यामुळे, डॉक्टरांनी भूल देवून त्याच्या नाकातून वस्तू काढून टाकण्याची योजना आखली आणि त्याच्यावर उपचार केले. मुलाच्या नाकात आठ लहान दगड, दोन लहान प्लास्टिक खेळणी आणि इतर प्लास्टिक अशा एकूण 14 वस्तू आढळल्या. ही शस्त्रक्रिया जटील होती. पण, तज्ज्ञ पथकाच्या मदतीने डॉ. कोळेकर यांनी मुलाच्या नाकातून वस्तू काढल्या. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. आर. एन. पाटील, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. जी. नेलविगी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशामत देसाई यांनी विशेष मुलावर यशस्वी उपचार करुन त्याच्या निरोगी आयुष्यासाठी योगदान दिल्याबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन केले. युएसएम केएलईचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर आणि केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनीही डॉक्टरांचे कौतुक केले आहे.