

वासुदेव चौगुले
खानापूर : उत्तर कर्नाटकाच्या विकासाचा डांगोरा पिटत बेळगावात तीन दिवसांपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच उत्तर कर्नाटकच्या तहानेसाठी पश्चिम भागातील जल, जंगल आणि जमीन ओरबाडून नेण्याचा प्रयत्न कर्नाटकी राज्यकर्त्यांचा आहे. मात्र भीमगड अभयारण्यातील गवाळी (ता. खानापूर) गावात भीषण पाणीटंचाई असून नव्वदी पार केलेल्या वृद्ध महिलांवर वाकलेल्या पाठीच्या कण्याला काठीचा आधार देत तब्बल एक किलोमीटर अंतरावरून घागरीने पाणी आणण्याची वेळ ओढवली आहे. हे विदारक चित्र मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांच्या नजरेला पडणार का, हा प्रश्न आहे.
नेरसा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीमधील गवाळी गाव दाट जंगलात वसले आहे. भीमगड अभयारण्याचा प्रदेश असल्याने या गावाचा रस्ता आणि पुलांच्या निर्मितीत वन विभागाचे नियम आड येतात. परिणामी, पावसाळ्यात गावाला दोन महिने बेटाचे स्वरूप प्राप्त होते. ते कमी म्हणून की काय आता चक्क डिसेंबर महिन्यातच गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी सोडण्यासाठी व मोटर दुरुस्तीचे काम करण्यासाठी गवाळी येथे कोणीही वॉटरमन जाण्यासाठी तयार नाही. पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याने गावापासून एक किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्याची वेळ वृद्ध महिलांवर आली आहे. पंचाहत्तरी पार केलेल्या या वृद्ध महिलांना चालणेदेखील कठीण असताना त्यांना काठीचा आधार घेत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
माध्यान्ह आहारालाही फटका
गावात सातवीपर्यंत शाळा आहे, पण पाणीटंचाईमुळे मुलांच्या माध्यान्ह आहारावर परिणाम झाला आहे. 15 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाल्याची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आली होती. तरीही काहीच उपयोग झाला नाही. 2 डिसेंबर रोजी गावात ग्रामसभा झाली. सभेतही हा विषय चर्चेला आला. पण अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. पाण्यासाठी गावातल्या वृद्ध महिलांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यात पाणी आणताना बुधवारी (दि. 10) एक वृद्धा पडून जखमी झाली.
गावात नैसर्गिक जलस्रोत असताना कृत्रिम पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. त्यासाठी कामाला असलेल्या वॉटरमनला केवळ तीन हजार रु. मानधन दिले जाते. त्याने कामबंद आंदोलन छेडून संपूर्ण गावाला वेठीस धरले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला. ग्रामस्थांना गाव सोडण्यासाठी भाग पाडण्याकरिता यंत्रणेला हाताशी धरून हा कृत्रिम पाणीटंचाईचा डाव खेळला जात नाही ना, असा संशय गावकरी व्यक्त करत आहेत.
आमच्या नशिबी हे भोग का?
गेल्या जन्मी आम्ही काही तरी पाप केले असेल म्हणून या जन्मी असे भयानक हाल आमच्या नशिबी आले आहेत. बाजूच्या जंगलातील वन्यप्राणी आणि आमच्या जगण्यात फारसा फरक राहिलेला नाही. जंगली श्वापदांना एक वेळ आमची दया येईल, पण नेत्यांना येणार नाही, अशी प्रतिक्रिया एका वृद्धेने दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.