

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायलच्या सैन्याने गाझामधील सुरक्षित क्षेत्रात असणार्या विस्थापितांच्या छावणीवर मोठा हल्ला केला. आज ( दि. १० सप्टेंबर) पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यात ४० जण ठार झाले असून, ६० जखमी झाले आहेत, असे वृत्त पॅलेस्टिनी अधिकार्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था APने दिले आहे. दरम्यान, आम्ही हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. (Israel-Hamas War)
इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, गाझातील खान युनिसमधील सुरक्षित क्षेत्रातील छावणीवर हल्ला करण्यात आला. आम्ही सुरक्षित क्षेत्रातील हमासच्या कमांड सेंटरला लक्ष्य केले. हा हल्ला गाझाच्या मुख्य दक्षिणी शहर खान युनिसमधील अल-मवासीवर झाला, ज्याला युद्धाच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने सुरक्षित क्षेत्र घोषित केले होते, जेथे हजारो विस्थापित पॅलेस्टिनी आश्रय घेतला हाेता.
गाझा नागरी संरक्षण अधिकारी मोहम्मद अल-मुगैर यांनी आज सकाळी वृत्तसंस्था 'एएफपी'ला सांगितले की, इस्त्रायल सैन्याने रात्रभर केलेल्या हल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत. तर 60 जखमी सापडले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Israel-Hamas War )
या हल्ल्याबाबत इस्रायलच्या सैन्याने म्हटलं आहे की, गाझातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हा हल्ला केला. आमच्या सैन्याने नागरी जीवितहानी टाळण्यासाठी अचूक युद्धसामग्री, हवाई पाळत ठेवणे आणि इतर माध्यमांचा या हल्ल्यावेळी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ( Israel-Hamas War )
इस्त्रायलने जुलै महिन्यात गाझातील संरक्षण क्षेत्रावर हल्ला केला होता. यामध्ये हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद डेफ ठार झाला होता. तसेच ९० पेक्षा अधिक ठार झाले होते.