

बेळगाव : गेल्या 15 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या प्रादेशिक सेना भरतीची सांगता झाली असून, 15 दिवसांत विविध राज्यातून युवकांनी सैन्य भरतीला गर्दी केली. शुक्रवारी शेवटच्या दिवशी तामिळनाडू व केरळ राज्यातील 300 युवकांनी हजेरी लावली. वयोमर्यादा 18 ते 42 वयोगट असल्याने 15 दिवसांत सुमारे 20 हजार युवकांनी सैन्य भरतीसाठी गर्दी केली.
मिलीटरी, पोलिस, स्थानिक पोलिसांच्या मदतीने भरती प्रक्रियेत चोख बंदोबस्त ठेवल्याने प्रादेशिक सेना भरती प्रक्रिया सुरळीत पार पडली. पहिल्या दिवशी शनिवारी (दि.15) गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली, दमण आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील युवकांनी सैन्य भरतीसाठी संधी दिली होती. मात्र या राज्यातून सैन्य भरतीसाठी गर्दी झाली नाही.
दुसर्या दिवशी तेलंगणा, गुजरातसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना पाचारण केल्यामुळे राष्ट्रीय मिलिटरी मैदानात युवकांनी गर्दी केली. त्यानंतर 17 ते 19 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहमदनगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदूरबार, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई ग्रामीण, नाशिक, परभणी, पुणे व रायगड जिल्ह्यातून सुमारे 9 हजार युवकांनी सैन्य भरतीसाठी गर्दी केली.
21 पासून 23 पर्यंत कर्नाटकातील कोप्पळ, धारवाड, चिक्कबळ्ळापूर, कोलार, तुमकूर, चित्रदुर्ग, गदग, गुलबर्गा, बळ्ळारी, बिदर, चिक्कमंगळूर, रामनगर, म़्हैसूर, मंड्या, बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, बागलकोट, हसन, मंगळूर, चामराजनगर, कारवार, उडपी, दावणगिरी, बेळगाव, शिमोगा, रायचूर, गदग, हावेरी, विजयनगर, यादगिरी व विजापूर जिल्ह्यातील युवकांना संधी मिळाली. 24 रोजी व 25 रोजी राजस्थानमधील 38 जिल्ह्यातील युवकांना सैन्य भरतीत प्राधान्य देण्यात आले.
27 रोजी आंध्रप्रदेश व केरळ राज्यातील युवकांना सैन्य भरतीत संधी देण्यात आली. शेवटच्या दिवशी शुक्रवारी तामिळनाडू व केरळ राज्यातील युवकांच्या भरतीने सैन्य भरतीची सांगता करण्यात आली.
भरतीचे चोख नियोजन
गतवर्षी 2024 मध्ये भरतीचे योग्य नियोजन न केल्याने एकाच दिवशी 15 हजार युवकांनी प्रादेशिक सेना भरतीला हजेरी लावली. युवकांना पांगवण्यासाठी बंदोबस्तासाठी असलेल्या मिलिटरी अधिकारी व पोलिसांनी लाठीमार केला होता. यंदा मात्र रहदारीची कोंडी झाली नाही. रोज पहाटेच सैन्य भरतीला प्रारंभ केल्याने सकाळी 7 च्या आता सर्व पात्र उमेदवारांना राष्ट्रीय मिलीटरी स्कूलच्या मैदानात प्रवेश मिळत होता.