खानापूर : चरण्यासाठी रानात सोडलेली गुरे घेऊन घरी परत येणाऱ्या गुराख्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हुळंद (ता. खानापूर) येथे घडली.
वासुदेव नारायण गावडे (६०) रा. हुळंद असे जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. गावापासून जवळच असलेल्या मैदानाजवळ ही घटना घडली. काँग्रेस नेते सुरेश जाधव यांना स्थानिकांकडून याबाबतची माहिती मिळताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी वासुदेव यांना बेळगाव सिव्हिल इस्पितळात दाखल केले. वासुदेव यांच्या तोंडाला व डोळ्याला जबर दुखापत झाली आहे. त्यांचा एक डोळा निकामी झाला आहे. रात्री उशिरा त्यांना अधिक उपचारांसाठी खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. वन्य प्राण्यांकडून त्यातही अस्वलाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांना पायबंद घालण्यासाठी वन खात्याने शाश्वत उपाय योजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.