

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका सध्या वादाच्या भोवर्यात सापडला आहे. टोलनाक्यापासून 20 किमी परिघात राहणार्या वाहनधारकांना टोलमाफी द्यावी अशी मागणी आहे. त्यासाठी बुधवारपर्यंत (दि. 11) मुदत देण्यात आली होती. पण, टोलनाका प्रशासनाने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे टोलनाक्यावर शनिवारपासून (दि. 14) चक्काजाम आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वाहनधारकांनी टोलनाका प्रशासनाला एका पत्राद्वारे दिला आहे.
कोगनोळी परिसरातील वाहनधारकांनी शुक्रवारी (दि. 6) स्थानिक चारचाकी वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी टोलनाका प्रशासनाकडे केली होती. यावेळी काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. टोल प्रशासनामधील संबंधित अधिकार्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन बुधवारी निर्णय देऊ, असे सांगितले होते. त्यानुसार वाहनधारकांनी बुधवारी पुन्हा एकदा कोगनोळी टोलनाक्यावर जाऊन विचारणा केली. पण, याबाबत निर्णय घेणारे अधिकारी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. सदर अधिकारी हजर नसल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.
आता शनिवारपर्यंत निर्णय न झाल्यास वाहनधारकांतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी कोगनोळी टोलनाका प्रशासन जबाबदार असेल, असेही सांगण्यात आले.
यावेळी सागर जाधव, सचिन परिट, राकेश परिट, अभिनंदन चौगुले, अनिल टोपाजी, राजू पसारे, अतूल पाटील, सुमित मधाळे, महेंद्र पाटील, दीपक खोत, राकेश मगदूम, रोहित मानकापुरे, हर्षद ढोबळे, शीतल ढोबळे, राहुल पाटील, सागर नवाळे यांच्यासह वाहनधारक उपस्थित होते.