

बेळगाव ः राज्यातील सरासरी लिंग गुणोत्तरात 2024 मध्ये अंशतः घट झाल्याचे आढळून आले असून प्रति एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 946 झाली आहे. 2023 व 2022 मध्ये ही संख्या 947 होती. सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार बेळगावात दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 932 असून जिल्ह्याचा समावेश निकृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये झाला आहे.
बिदर जिल्हा स्त्री-पुरुष प्रमाणात आघाडीवर आहे. या जिल्ह्यात स्त्रियांचे प्रमाण 991 असून गत दोन वर्षांत त्यात आश्चर्यकारकरित्या वाढ नोंदविण्यात आली आहे. 2023 मध्ये बिदरमध्ये दर हजार पुरुषांमागे 965 तर 2022 मध्ये 940 स्त्रिया होत्या. त्यात आता 26 ने वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उडुपी जिल्ह्यातही स्त्रियांची संख्या वाढून 979 झाली आहे. 2023 मध्ये ही संख्या 965 होती. हासनमध्ये ही संख्या 955 वरुन 978 वर पोचली आहे. याशिवाय शिमोगा (969) व धारवाडचा (967) समावेशही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांत झाला आहे.
सर्वात निकृष्ट गुणोत्तर असलेल्या जिल्ह्यांमध्ये मंड्या (915) यावेळेसही आघाडीवर आहे. मात्र, समाधानाची बाब अशी की जिल्ह्याने 2024 मध्ये 900 चा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात 2023 मध्ये स्त्रियांचे प्रमाण 889 व 2022 मध्ये 882 होते, हे विशेष. मंड्याप्रमाणे गदगमध्येही 915 (938) स्त्रिया आहेत. त्यावर बंगळूर ग्रामीण (917), चिक्कमगळूर (928), चित्रदुर्ग (930) आणि बेळगाव (932) असा क्रम आहे. काही जिल्ह्यांमधील स्त्रियांची संख्या चिंताजनकरित्या कमी झाली आहे. बंगळूर ग्रामीणमध्ये ही संख्या 955 (2023) वरुन 917 (2024) झाली आहे. चामराजनगरमध्ये 952 वरुन 937, चिक्कबळ्ळापूर 979 वरुन 954, चिक्कमगळूर 976 वरुन 928 आणि चित्रदुर्गमध्ये 957 वरुन 930 पर्यंत घसरली आहे. आश्चर्य म्हणजे 2023 मध्ये स्त्रियांच्या संख्येत आघाडीवर असलेल्या कोडगूत ही संख्या 986 वरुन 955 पर्यंत कमी झाली आहे.
राज्यातील लिंग गुणोत्तर नेहमीच 950 पेक्षा कमी नोंदविण्यात आले आहे. 1981 मध्ये राज्यात दर हजारी स्त्रियांची संख्या सरासरी 975 होती. 2001 मध्ये ती 946 पर्यंत खालावली. तर 2011 मध्ये 948 पर्यंत स्थिरावली. हे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरातील असंतुलन आणि जास्त स्त्री मृत्युदरामुळे हा प्रकार होत असावे, असा समज आहे. तरीसुद्धा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे घटते प्रमाण चिंताजनक असल्याचे नोंदविण्यात आले आहे.