

बेळगाव : कोट्यवधी रुपये खर्च करून आरटीओ कार्यालयाची हायटेक इमारत उभारण्यात आली; मात्र या कार्यालयातील कामाची पद्धत जुनीच सुरू असल्याने कार्यालय उभारूनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच जुना टेबल ठेवून त्या ठिकाणी येणार्यांची चौकशी करून प्रवेश दिला जात आहे.
या इमारतीसाठी तसेच आतील विभाग तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, प्रवेशद्वाराजवळ चौकशी कक्षाची उभारणी करण्याऐवजी त्या ठिकाणी टेबल ठेवण्यात आला आहे. उपनोंदणी व अबकारी खात्यानंतर सर्वात जास्त उत्पन्न देणारे कार्यालय म्हणून आरटीओ कार्यालयाकडे पाहिले जाते. या कार्यालयासाठी आता सरकारने मोठा निधी दिला. त्याची उभारणी करण्यात आली. मात्र, योग्य प्रकारे नियोजन करून कक्षांची उभारणी केली गेली नाही. त्यामुळे काही दिवसांतच या कार्यालयाला अवकळा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयामध्ये केवळ कन्नड भाषेतच फलक लावण्यात आले आहेत. वास्तविक तीन भाषांमध्ये फलक लावणे गरजेचे आहे. मात्र, कन्नडमध्ये फलक लावून इतर भाषिकांची मुस्कटदाबी करण्यात आली आहे. या कार्यालयात केवळ कन्नड भाषिकच कामासाठी येत नाहीत तर विविध राज्यातील जनता कामानिमित्त येत असते. विशेष करून सीमाभागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत. त्यांना कन्नड येत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी या कार्यालयात तातडीने तीन भाषांमध्ये फलक लावावेत, अशी मागणी होत आहे. इतर राज्यातील वाहनांचा अपघात झाल्यानंतर किंवा इतर कामानिमित्त वाहन चालक, मालक येत असतात. त्यांना कन्नड येत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तातडीने तिन्ही भाषेमध्ये फलक लावावेत अशी मागणी होत आहे.