

खानापूर : डांबरीकरणानंतर अवघ्या चारच महिन्यांंत जांबोटी-चोर्ला रस्त्याची अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. दर्जाहीन कामामुळे जागोजागी 50 ते 100 फुटांपर्यंत डांबर गायब झाले आहे. परिणामी या रस्त्याचे यंदाच्याच मे महिन्यात डांब-रीकरण झाले होते असे सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही. त्यामुळे, असला विकास नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ प्रवासी, वाहनचालक व पश्चिम भागातील लोकांवर आली आहे.
बेळगावला गोव्याशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरुन वाहनांची मोठी वर्दळ असते. रणकुंडये ते गोवा हद्दीपर्यंतच्या 43 किलोमीटर अंतर रस्त्याचे 59 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डांबरीकरण केले होते. यामध्ये कुसमळीजवळील पुलाचाही समावेश होता. पहिल्या टप्प्यात जांबोटी ते कणकुंबी, कणकुंबी ते चोर्ला आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उचवडे क्रॉस ते जांबोटी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले होते. मे महिन्यात डांबरीकरणाचा दुसरा थर टाकण्यात आला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या महिनाभरात डांबर उखडून खड्डे पडण्यास सुरुवात झाली. पाऊस गेल्याने आता रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्यांच्या मागून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी चालकांना धुळीमुळे दहा फुटावरचेही दिसेनासे झाले आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजूपट्ट्यांचेही काम शिल्लक ठेवण्यात आल्याने दुचाकी अपघात नेहमीचे झाले आहेत. या भागात संततधार पाऊस होतो. रस्त्यावरुन नाले वाहतात. या पाण्याचा योग्य रीतीने निचरा होत नसल्याने ते रस्त्यावरच साचून खड्डे आणि डबकी तयार होणे नित्याचे झाले आहे. डांबरीकरणाचे दोन थर झाल्याने किमान वर्ष दोन वर्षे तरी खड्डेमुक्त प्रवासाचा अनुभव घेता येईल. अशी गोमंतकीय आणि बेळगावकरांना आशा होती. कंत्राटदार आणि प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे ती धुळीला मिळाली आहे. चारच महिन्यात या मार्गाची धुळधाण उडाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नावाने लाखोली वाहिली जात आहे.