

बेळगाव : मंगळवारपासून सुरू झालेली कोसळधार बुधवारी आणखी तीव्र झाल्याने जिल्ह्यात पावसाने कहर माजवला आहे. मार्कंडेय, मलप्रभा, घटप्रभा, हिरण्यकेशीसह सातही नद्यांना पूर आला असून, नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यात 24 तासांत सर्वाधिक 4 इंच पाऊस खानापूर तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ बेळगाव तालुक्यात 2 इंच पाऊस झाला आहे. पावसामुळे चिकोडी विभागातील तब्बल 11 पूल पाण्याखाली गेले आहेत. वाढलेल्या पावसामुळे आज (दि. 26) बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना जिल्हाधिकार्यांनी सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस शाळा बंद राहतील.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 23.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त खानापूर तालुक्यात पाऊस झाला असून तब्बल 103.2 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. यामुळे बेळगावसह खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यातच नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव शहरातून वाहणार्या लेंडी आणि बळ्ळारी नाल्याचे पाणी शिवारात शिरले असून, भात पिके पाण्याखाली गेली आहेत.
बुधवारी झालेल्या दमदार पावसाने अनेक रस्त्यावर पाणी साचून होते. वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. अनेक रस्त्यावर पाणी साचल्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसामुळे गटारीतील कचरा वाहून रस्त्यावर आला होता. त्यामधून पादचार्यांना वाट काढताना कसरत करावी लागत होती.
पावसाने सकाळी काहीशी उघडीप दिली होती. मात्र 9 नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर दमदार सरी कोसळत राहिल्या. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरूच होता. पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला.
सलग दोन दिवस दमदार पाऊस कोसळल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी, नाल्यांचे पाणी पात्रा बाहेर आले असून अनेक भागात पाणी शिवारात शिरले आहे.
जिल्ह्यात खानापूर तालुक्यात आतापर्यंत सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 25 दिवसांत सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून खानापूर तालुक्यात 588.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल बेळगाव तालुक्यात गेल्या 25 दिवसात 251.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.