

बेळगाव : शहर परिसरात सोमवारपासून (दि. 23) जोरदार पाऊस सुरु असून, अनेक ठिकाणी पाणी साचून राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी मंगळवारी (दि. 24) ठिकठिकाणी पाहणी केली. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी त्यांनी तीन पथकांची रचना केली असून 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी तक्रारी येत होत्या. त्यामुळे, आयुक्त शुभा यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. नाले तत्काळ स्वच्छ करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. पावसामुळे कोसळलेली झाडे हटवावीत, असे सांगितले. शाहूनगरमध्ये कोसळलेले झाड हटवण्यात आले. आयुक्तांच्या सूचनेनंतर नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी तीन जेसीबी, दोन जॅकिंग वाहने आणि सकिंग वाहने कार्यरत करण्यात आली.
आयुक्तांनी नानावाडी, गजानन महाराजनगर, मणियार कॉलनी, कोनवाळ गल्ली, शाहूनगर परिसरात पाहणी केली. त्याठिकाणी नाल्यातून पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने नाला सफाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण, पर्यावरण विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी, आदिलखान पठाण उपस्थित होते.
पावसामुळे शहरात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी महापालिकेच्या तीन पथकांची स्थापना करण्यात आली. चोवीस तास या पथकांनी सतर्क राहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर वाढला तर निवारा केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत.
विद्यानगरमध्ये रस्त्यात पडलेल्या धोकादायक खड्ड्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे, नगरसेविका वीणा विजापुरे यांनी वारंवार तक्रार करुनही त्यावर कार्यवाही झाली नाही. अखेर त्यांनीच आज पुढाकार घेऊन तो धोकादायक खड्डा बुजवला.