

बेळगाव : आजकाल सायबर क्राईमच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढून लोकांची फसवणूक केली जात आहे. यातून पोलिसही सुटलेले नाहीत. आता तर एका भामट्याने चक्क बेळगावच्या पोलिस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 22) उघडकीस आला आहे. त्यामुळे, पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्वांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवेगिरीचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. आता पोलिस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल काढण्यात आल्याने खळबळ माजली आहे. त्याविरोधात त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याचबरोबर तातडीने संबंधित बनावट अकाउंटला कोणीही प्रतिसाद देऊ नये, असे त्यांनी कळविले आहे.
पोलिस आयुक्तांच्या नावे फेसबुक प्रोफाइल तयार केल्यानंतर अनेकांना फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून देण्यात आली आहे. त्या भामट्याने काही वेळातच अनेकांना हा मेसेज पाठवल्यामुळे तातडीने सदर कारवाई करण्यात आली आहे.
या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल झाली असून त्याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. यापूर्वी अनेक मोठ्या अधिकारी तसेच नामांकित व्यक्तींच्या नावाने फेसबुक अकाउंट तयार करुन लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र रविवारी उघडकीस आलेल्या घटनेमुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.