Malaprabha river belgaum : खानापूरकरांनो जागे व्हा, मलप्रभेचे वस्त्रहरण थांबवा

विकासाच्या नावाखाली जलसंपत्तीचे नियोजन करताना मूळ नदीपात्र आणि स्थानिक गरजांचा विचार होणे आवश्यक आहे
Malaprabha river
Malaprabha river
Published on
Updated on

वासुदेव चौगुले

खानापूर : तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून ऐन पावसाळ्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. नदीतील पाणी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून अन्य भागांकडे वळविण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थलांतर आणि विविध कारणांसाठी तालुक्यातील जमिनी ओरबाडून खाण्याचे प्रकार थांबलेले नसताना आता चक्क खानापूरचे अस्तित्व आणि अस्मिता असलेल्या मलप्रभा नदीचे वस्त्रहरण होत असताना ते थांबवण्यासाठी कोण पुढाकार घेणार हा सद्यस्थितीतील सर्वाधिक चर्चेचा प्रश्न ठरला आहे.

कुसमळी आणि पारिश्वाड परिसरातून मलप्रभा नदीचे पाणी भुयारी पाइपलाइनद्वारे बेळगाव तालुक्यातील गावांकडे नेऊन तलाव भरणा प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने या विषयावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. मलप्रभा नदी ही केवळ जलस्रोत नसून खानापूर तालुक्याच्या शेती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. वर्षभर नदीतील वाहते पाणी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून भूजल पातळी टिकवून ठेवण्यासही महत्त्वाची भूमिका बजावते. उन्हाळ्यातील दीड दोन महिन्याचा मर्यादित कालावधी वगळता नदीचा प्रवाह कायम असल्यामुळे नदीकाठच्या गावांतील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा मोठ्या प्रमाणात पूर्ण होतात.

Malaprabha river
Khanapur Flood Updates | मलप्रभा नदीला पूर, निलावडे भागाचा संपर्क तुटला (‍‍Video)

दरम्यान, नदीतील पाणी सातत्याने इतर भागांकडे वळविले जात राहिल्यास भविष्यात नदीपात्रात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकल्पांचा परिणाम त्वरित जाणवणार नसला तरी पुढील पाच ते दहा वर्षांत त्याचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात. भूजल पातळी घटणे, नदीकाठच्या शेतीवर परिणाम होणे, पर्यावरणीय समतोल बिघडणे आणि पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Malaprabha river
Mahadayi River Dispute | म्हादई प्रकल्पाला केंद्राचा ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत पर्यावरणीय मंजुरीला स्थगिती

विकासाच्या नावाखाली जलसंपत्तीचे नियोजन करताना मूळ नदीपात्र आणि स्थानिक गरजांचा विचार होणे आवश्यक आहे. रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्या तरी तालुक्याच्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मलप्रभा नदीचे जिवंत अस्तित्व कायम राखण्यासाठी नदीतील पाण्याचा अनियंत्रित उपसा आणि वळवणूक थांबविण्याची मागणी जोर धरत आहे.

Malaprabha river
Panchganga River Flood Update| पाऊस मंदावला; पंचगंगेला ओहोटी

या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र झाला असून, कोणत्याही परिस्थितीत खानापूर तालुक्याच्या जलहक्कांवर गदा येऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहे. विविध सामाजिक संघटना, शेतकरी गट आणि नागरिकांनी या विषयावर एकत्र येण्यास सुरुवात केली असून, लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रश्नावर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. मलप्रभा नदीच्या पाण्याच्या प्रश्नावर सर्वपक्षीय एकजूट निर्माण करून शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तालुक्याच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या विषयावर आगामी काळात जनआंदोलन उभारण्याची शक्यताही स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत असून, पाण्याचा प्रश्न आता केवळ विकासाचा नव्हे तर खानापूरच्या अस्तित्वाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या हक्कांचा प्रश्न बनल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news