Panchganga River Flood Update| पाऊस मंदावला; पंचगंगेला ओहोटी

नऊ इंचांनी घटली पातळी; १५ बंधारे खुले
कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र  पावसाने उसंत घेतल्‍याने नद्यांचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. तरीही प्रयाग चिखली परिसरातील शेतात पंचगंगेचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गुरुवारी ड्रोनव्‍दारे टिपलेले छायाचित्र.
कोल्हापूर : जिल्ह्यात सर्वत्र पावसाने उसंत घेतल्‍याने नद्यांचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. तरीही प्रयाग चिखली परिसरातील शेतात पंचगंगेचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गुरुवारी ड्रोनव्‍दारे टिपलेले छायाचित्र.
Published on
Updated on

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने अखेर विश्रांती घेतली. गुरुवारी शहरासह जिल्ह्यात दिवसभर सूर्यराजाचे दर्शन झाले. परिणामी, पंचगंगेच्या पुराला ओहोटी लागली आणि तासागणीक वाढणाऱ्या पाणी पातळीत घट सुरू झाली. दिवसभरात पंचगंगा पातळीत ९ इंचांची घट होऊन पातळी रात्री १२ वाजता ३६ फूट ४ इंचांवर होती. गायकवाड वाड्याजवळ आलेले पुराचे पाणी रस्त्याच्या एका बाजूला सरकले. कागलमध्‍ये भिंत अंगावर कोसळून महिलेचा मृत्‍यू झाला.

दिवसभरात १५ बंधारे खुले झाले असून अद्याप ४२ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये राधानगरीसह १० धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली, तर जिल्ह्यात सरासरी २२ मि.मी. पाऊस झाला.

धरणांत ४७.४३ टीएमसी साठा; राधानगरी ५९, वारणा ५८, दूधगंगा २९ टक्के भरले

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख १७ धरणांत गुरुवारी (दि. ९) दुपारी चार वाजेपर्यंत ४७.४३ टीएमसी पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील धरणांत एकूण ९६.०७ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे, त्या तुलनेत ४९.३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने वाढत गेली. परिणामी सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. दरम्यान घटप्रभा, त्यापाठोपाठ कोदे आणि जांबरे ही तीन लहान धरणे पूर्णपणे भरली आहेत. राधानगरी धरण गुरुवारी ५९.४० टक्के इतके भरले. दूधगंगा धरण २८.८३ टक्के भरले आहे. वारणा ५७.७५ टक्के तर तुळशी धरण ५५.२४ टक्के भरले आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत केवळ कासारी (२५ मि.मी.) व घटप्रभा (११ मि.मी.) वगळता अन्य सर्व धरण क्षेत्रात तुरळक पाऊस झाला. पावसाचा जोर कमीच राहिला तर धरणातील साठ्यात यापुढे संथ वाढ होईल, अशी शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news