

Laxmi Hebbalkar Son Driver Attack
बेळगाव : राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र व काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कार चालकावर अज्ञात समाजकंटकांनी चाकूने हल्ला केला. मंगळवारी (दि.६) दुपारी अडीचच्या सुमारास बेळगाव क्लब रोडवरील बी शंकरानंद यांच्या घराजवळ ही घटना घडली.
हल्ल्यानंतर संशयित पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. बसवंत गणपती कडोलकर (वय २६, बेळगुंदी, ता. बेळगाव) असे जखमीचे नाव आहे. आर्थिक व्यवहार अथवा वैयक्तिक कारणातून हा हल्ला झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे.
युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कारवर चालक असलेला तरुण बसवंत हा कामानिमित्त क्लब रोडवर गेला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवत भांडण काढले. यानंतर चाकूने त्याच्या छातीवर, पोटावर व पायावर वार केले. तीन वार केल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या बसवंतला सोडून हल्लेखोर आलेल्या दुचाकी वरून पसार झाले. जखमी बसवंतला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपल्या कार चालकावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच मृणाल हेब्बाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हा हल्ला कोणत्या कारणातून केला, हल्लेखोर त्याच गावचे आहेत की अन्य गावचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आर्थिक व्यवहार अथवा पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
घटनास्थळी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, मार्केटचे पोलीस निरीक्षक जे एम कालीमिर्ची, कॅम्पचे निरीक्षक आनंद वनकुद्रे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली. कॅम्प पोलिसात नोंद झाली असून पोलीस निरीक्षक आनंद वनकुद्रे पुढील तपास करीत आहेत