

बेळगाव ः ऊसतोडणी मशीनवर चालक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, त्याने ट्रॅक्टर ट्रेलरच्या मागील बाजूस गळफास घेतला असून त्याचे पाय टेकत असल्याने संशयास्पद मृत्यू अशी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. निजगुणी यल्लाप्पा अंबी (वय 23, मूळ रा. हुनशाळ पीजी, ता. मुडलगी, सध्या रा. वाघवडे) असे मृताचे नाव आहे.
याबाबत वडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निजगुणी हा नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या गावाहून ऊसतोडणी मशीनवर काम करण्यासाठी बेळगाव तालुक्यातील वाघवडे येथे आला होता. येथील सुनील विठ्ठल पाटील यांच्या मालकीच्या मशीनवर तो कार्यरत होता. शुक्रवारी 2 जानेवारी रोजी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास त्याने ट्रॅक्टर ट्रेलरच्या मागील असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे पाय टेकत असल्याने ट्रॅक्टर ट्रेलरवर पाय ठेवून तो स्वतःचा जीव वाचवू शकला असता. परंतु, अशाप्रकारे त्याने आत्महत्या केल्याने पोलिसांनी संशयास्पद मृत्यू अशी नोंद करून घेतली आहे. याप्रकरणी मृताचे वडील यल्लाप्पा होळेप्पा अंबी (रा. हुनशाळ पीजी, ता. मुडलगी) यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक नागनगौडर कट्टीमणीगौडर तपास करत आहेत.