

बेळगाव ः जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील बसवेश्वर-केंपवाड आणि रामदुर्ग तालुक्यातील वीरभद्रेश्वर आणि सालापूर उपसा सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीबाबत बुधवारी (दि. 10) सुवर्णसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आढावा बैठक घेतली.
कागवाड तालुक्यातील 22 दुष्काळग्रस्त गावांपैकी 27,462 हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा बसवेश्वर उपसा सिंचन प्रकल्प 2017 मध्ये आमचे सरकार सत्तेत असताना सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पावर आतापर्यंत 1158 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. जून अखेरपर्यंत प्राधान्याने काम पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 652 एकर जमीन संपादित करणे आवश्यक आहे आणि भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि शेतकर्यांच्या शेतांना सिंचन करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
रामदुर्ग तालुका, मुधोळ तालुका आणि बदामी तालुक्यातील एकूण 22 दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणार्या सालापूर उपसा सिंचन प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचप्रमाणे बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील एकूण 34 दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणार्या वीरभद्रेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू कागे, अशोक पट्टण आदी उपस्थित होते.