

बेळगाव ः हिंडलगा कारागृहातील शौचालयाच्या भिंतीत दोन मोबाईल, सीमकार्ड, चार्जर व यूएसबी केबल लपवून ठेवल्याचे सोमवारी (दि. 22) रात्री केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. दोन्ही मोबाईलसह अन्य वस्तू कारागृह प्रशासनाने जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात कैद्यांविरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोककुमार यांनी राज्यातील सर्व कारागृहांची झाडाझडती घेण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरातील कारागृहात 67 मोबाईल, तर हिंडलगा कारागृहात चार मोबाईल सापडले होते. तपासणी सुरू झाल्यानंतर काही गांजाची पाकिटे कैद्यांनी भिंतीवरून पलीकडे फेकल्याचा प्रकारही हिंडलगा कारागृहातच घडला होता. यावरून कधी नव्हे, तर कारागृह प्रशासन सतर्क बनले आहे. परंतु, त्यामागे एडीजीपी अलोककुमार यांचा धाक असल्याचे दिसून येत आहे. हिंडलगा कारागृह प्रशासनाने सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुन्हा सर्कल एकमधील बराक क्रमांक सातची झडती घेतली. ही झडती तब्बल अडीच तास म्हणजेच रात्री एकपर्यंत सुरू होती. यावेळी येथील शौचालयातील भिंतीला भोक पाडून त्यामध्ये मोबाईल व अन्य साहित्य लपवल्याचे आढळून आले. परंतु, ते कुणी लपविले होते, हे स्पष्ट झालेले नाही. सहायक अधीक्षक मल्लिकार्जुन कोन्नूर यांनी अज्ञात कैद्यांविरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.