

हलगा : ऐन हिवाळ्यातच अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळी हलगा परिसराला झोडपले. जोरदार पावसाने गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानकपणे पाऊस आल्याने अनेकजण कामावरुन घरी परतत असताना भिजून चिंब झाले.
वळीव पावसाची सुरुवात ही प्रामुख्याने मार्च महिन्यापासून होते. परंतु जानेवारीपासूनच या पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हलगा परिसरात सध्या रब्बी हंगामातील पिके आहेत. परिसरातील मसूर, मोहरी, वाटाणा, हरभरा, जोंधळा या पिकांना याचा फायदा होईल की तोटा हे नजीकच्या काळात दिसेल, असा शेतकऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे.