

राजेश शेडगे
निपाणी ः शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लोकमान्य टिळक उद्यानाच्या विकासाकडे निपाणी नगरपालिकेने लक्ष दिले असल्याने येथे आता विद्युत दिवे बसविल्याने अंधार दूर झाला असून नागरिकांना व्यायामासाठी साहित्य बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच येथे पेव्हर ब्लॉक घातले जाणार असून नागरिकांच्या सहभागातून लहान मुलांची खेळणी बसवली जाणार आहेत. विकासाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सदर उद्यानाला उतरती कळा लागली होती. मात्र गेल्या महिन्याभरात सदर उद्यानाला ऊर्जितावस्था मिळू लागली आहे. दै. ‘पुढारी’ने 20 डिसेंबर रोजी निपाणीतील उद्याने बनली भकास या मथळ्याखाली दिलेल्या वृत्ताची पालिकेने दखल घेऊन कामे हाती घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहराभोवती 132 लेआऊट झाले असले तरी मोजकीच उद्याने आहेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक उद्यान हे सर्वात जुने असून, नगरपालिकेजवळील उद्यान, प्रतिभानगर, गायत्री उद्यान व छत्रपती शिवाजी उद्यान विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. लोकमान्य टिळक उद्यान हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने विरंगुळासाठी येथे नागरिकांची ये-जा असते. काही वर्षांपूर्वी येथे नागरिकांच्या सहकार्यातून विविध खेळणी उभारण्यात आली होती. परंतु, आता हे साहित्य मोडकळीस आले आहे. या बागेत पुरेशी बसण्याची सोय नाही. पथदीपांचा अभाव होता. दै.‘पुढारी’ने वृत्त दिल्यानंतर निपाणी नगरपालिका प्रशासनाने येथे पथदीप लावले आहेत. उद्यानाच्या दक्षिणेकडील भागात सध्या व्यायामाचे साहित्य उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना व्यायामाची मोफत सोय होणार आहे. उशिरा का होईना या उद्यानाच्या विकासाला चालना मिळाली आहे.
विकासाकडे लक्ष देण्याची मागणी
प्रतिभानगर येथील उद्यानातदेखील विविध सोयीसुविधा निर्माण करून देऊन नागरिकांना चांगले उद्यान निर्माण करून देण्याची मागणी होत आहे. छत्रपती शिवाजी उद्यानात विमान बसवले असले तरी अन्य विकासकामे रखडली आहेत. येथे ‘आय लव्ह यू निपाणी’ सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. परंतु अद्याप सुरू केलेला नाही. या उद्यानात पुरेशी झाडे लावण्याची गरज असून उद्यानाशेजारी खाऊकट्टा उभारला जावा, अशी मागणी होऊ लागली आहे. शहरातील विविध उद्यानांत कायमचा माळी नियुक्त करून उद्यानांची निगा राखली जावी, अशी मागणी आहे. सध्या पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी उद्यानांच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.