

बेळगाव : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पावसामुळे आडवी झाली आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकाचीही हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
बेळगाव तालुक्याचा पश्चिम भाग वगळता सर्व भागात रब्बी हंगामात कडधान्य व ज्वारीचे पीक घेण्यात येते. भात कापणीनंतर पेरण्यात आलेले पीक सध्या बहरले होते. यामुळे शेतकरी आनंदीत होता. परंतु, मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी पडले आहे. हातातोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपले. या भागात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पिके घेण्यात येतात. या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर भाजी पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील कडोली, हंदिगनूर, चलवेनहट्टी, बोडकेनहट्टी, केदनूर, बंबरगा, देवगिरी परिसरालाही पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपले आहे. यामुळे पिकांची हानी झाली आहे. काही भागात शेतातून पाणी साचले आहे. प्रामुख्याने याचा फटका भाजी पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.