

खानापूर : पुलांचे अर्धवट काम, पर्यायी रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि अपघातांना कारणीभूत ठरणारे सदोषपूर्ण रस्ताकाम यामुळे गुंजी ते तिनईघाटपर्यंतचा मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. पुलांच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याची अक्षरशः धूळधाण उडाली आहे. चक्काजाम होऊन वाहनचालकांमधील वाद हाणामारीपर्यंत विकोपाला जात आहेत. असे असतानाही कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरण झोपेचे सोंग घेतल्यासारखे वागत असून अपघात आणि प्रवाशांच्या अडचणींना ब्रेक कधी लागणार असा सवाल केला जात आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे कुठे चर तर कुठे धोकादायक खोदकामाचे गतिरोधकांसारखे अडथळे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. पूल वगळता महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याने वाहनचालक सुसाट वेगाने येत आहेत. मध्येच अचानक पुलाचे अर्धवट काम आणि उंचवट्याचा भाग येत असल्याने अपघात नित्याची बाब बनली आहे. नवीन वाहनचालकांना बाजूपट्टी नसल्याचा अंदाज येत नसल्याने वाहन बाजूला घेतल्यास चिखलात अडकून बसून कधीही चक्काजाम परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रकार वाढले आहेत.
पावसाळ्यापूर्वी काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले होते. पण, अतिवृष्टीमुळे खड्ड्यातील माती व खडी वाहून गेली असून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने या रस्त्यांची धूळधाण उडाली आहे. या खड्ड्यांमुळे चारचाकी व दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुलांचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने वाहतुकीसाठी बाजूने सखल भागातून पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. याठिकाणी पावसाचे पाणी साचून खड्ड्यांमुळे वाहनांची अक्षरशः दाणादाण उडत आहे. वाहने नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.
तिनईघाटजवळील बरलकोड टोल नाक्याजवळ विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे या सर्व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महामार्गाच्या कामाच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या दौर्यानिमित्त या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. पण पुन्हा खड्ड्यांनी भीषण रुप धारण केल्याने अपघातांची टांगती तलवार घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.
संगरगाळी क्रॉस, गुंजी, भालके खुर्द क्रॉस, जोमतळे जवळील हत्ती ब्रिज, वाटरे, लोंढा बायपास, रामनगर, तिनईघाट या ठिकाणी पुलांचे काम अर्धवट स्थितीत असल्याने केवळ माती टाकून बनवण्यात आलेले पर्यायी रस्ते वाहतूक कोंडी व अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. तिनईघाटजवळ तर वाहतूक कोंडीमुळे रोज शेकडो वाहनांची रांग लागत आहे. या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे मोठी शिक्षा भोगण्यासारखे आहे.
रुपेश कुट्रे, गुंजी