

Khanapur Jamboti Road Condition
खानापूर : बेळगाव-जांबोटी मार्गावरील कुसमळीजवळचा रस्ता वाहून गेल्याने खानापूर-जांबोटी मार्गावरील वाहतुकीवर ताण पडला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने आधीच खड्डेमय बनलेल्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात बस व अवजड वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने 15 किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल तासभर वेळ लागत आहे. अवघ्या दोनच दिवसांत येथील प्रवासाला प्रवासी कंटाळले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कुसमळीजवळच्या पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले नाही. ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते. तथापि, अद्याप महिनाभराचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत पर्यायी रस्ता निर्माण करुन वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे मलप्रभा नदीला आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे, बेळगाव-जांबोटी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ती पुढील महिनाभर तरी बंद राहणार आहे. तोपर्यंत चोर्ला मार्गे बेळगाव-गोवा प्रवास करणार्या वाहनचालकांना खानापूर मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटक परिवहन, गोवा परिवहन यासह खासगी आराम बसेस आणि सर्व प्रकारची अवजड वाहने खानापूर जांबोटी मार्गे ये-जा करत आहेत.
हा रस्ता अवघ्या बारा फूट रुंदीचा असून बाजूपट्टीचाही अभाव आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या रस्त्यावर आडव्या आल्या आहेत. त्याशिवाय जागोजागी धोकादायक वळणे आहेत. अधिक उंचीच्या आरामदायी बस आणि कंटेनरसारखी अवजड वाहने या मार्गाने जाणे इतर वाहनांना धोकादायक ठरत आहे. तरीही पर्यायी रस्ता नसल्याने या मार्गाने जाणार्या अवजड वाहनांना जागा देताना लहान वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खानापूर-जांबोटी रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. पावसाळ्यापूर्वी किमान धोकादायक खड्डे बुजविण्याचे सौजन्य बांधकाम खात्याने दाखवणे आवश्यक होते. ते दाखवले गेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात जांबोटी भागातील लोकांचे अतोनात हाल होत आहेत.
समोरून येणार्या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात बाजूपट्टीवरून वाहन घसरुन चरीत कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे, समोरासमोर आलेले वाहनचालक दुसर्या वाहनाला जागा देण्यासाठी आपले वाहन मागे घेण्यास नकार देत आहेत. यामुळे वादावादीचे प्रकार घडत आहे. सोमवारी दुपारी दोन चालकांमध्ये जुंपल्याने वाहनांची रांग लागली होती.