

बेळगाव ः जिजामाता चौक येथील उड्डाणपुलावर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतील फलकाची उभारणी करण्यात सोमवारी आली. जिजाऊ जयंतीनिमित्त या फलकाचे अनावरण करण्यात आले.
जिजामाता चौकातील उड्डाणपुलाचे 2019 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण करण्याचा ठराव महापालिकेने संमत केला होता. त्यानुसार तब्बल सहा वर्षांनंतर सोमवारी (दि. 12) पुलावर नावाचा फलक उभारण्यात आला. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्या हस्ते चौकात जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतील फलक उभारण्यात आली. यावेळी या प्रभागाच्या नगरसेविका पूजा पाटील, गिरीश धोंगडी, राजू भातकांडे, जयंत जाधव, इंद्रजित पाटील व इतर लोक उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. उड्डाणपूल संपतो, त्या समर्थनगर परिसरातही काही दिवसांत अशाच फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.