

बेळगाव ः महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 12) होणार आहे. नव्या वर्षातील ही पहिलीच सर्वसाधारण सभा असून त्यामध्ये मोकाट कुत्री, बापट गल्लीतील कार पार्किंगचा विषय गाजण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.
सर्वसाधारण सभेत एकूण 11 विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शहर परिसरात वाढलेला मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, बापट गल्ली कार पार्किंगमध्ये झालेला 27 लाख रुपयांचा घोळ, पोलिस लाईन आणि क्लब रोड येथील पार्किंगचा ठेका देणे, या विषयांसह बंजारा समाजाला चौदा गुंठे जागा देणे, बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र न घेतलेल्या बहुमजली इमारतींवर कर लावणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
डिसेंबरमध्ये विधिमंडळ अधिवेशनाआधी सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सभा घेण्याच्या हालचाली होत्या. पण, ही सभा आता सोमवारी आयोजित करण्यात आली आहे.