

अंकली : कृष्णाकाठासह परिसरातील अनेक भागात उसाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. अलीकडे ऊस पिकाचा वाढता खर्च पाहता परवडणारे नसल्याने परिसरातील शेतकरी आता ऊस पिकामध्ये आंतरपीक घेत आहेत. उसाचे पीक फायदेशीर ठरण्यासाठी आंतरपीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. आंतरपिकातून लागवडीचा खर्च सहज वसूल होत असल्याने सदर पर्याय बहुतांश शेतकऱ्यांकडून वापरला जात आहे.
यंदा कृष्णाकाठासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडून आंतरपीक प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. सुरुवातीचा ऊस अथवा खोडवा ऊस या दोन्हीमध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी आंतरपीक घेऊन ऊस शेती फायद्याची ठरवली आहे. उसामध्ये आंतरपीक म्हणून कांदा, भुईमूग मका, मिरची आदी पिके घेण्यात येत आहेत. मुबलक पाणीसाठा असल्याने आंतरपीक घेणे फायद्याचे ठरले आहे. बहुसंख्य शेतकरी ऊस कांडी तसेच रोप पद्धतीचा अवलंब करून आंतरपीक घेताना दिसतात. काही शेतकरी रुंद सरी पद्धतीने उसाची लागवड करून हंगामानुसार उसात अंतर पिके घेताना दिसतात. वर्षभरात केवळ उसाचे पीक घेणे तारेवरची कसरत ठरत असल्याने अनेक शेतकरी जोड पिकाचा पर्याय शोधत आहेत. बियाणे, खते व मशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पादनातून निघून जात आहे. तसेच पिकामधील तनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
उसाच्या दोन सरीमधील अंतर इतर हंगामी पिकाच्या तुलनेत जास्त असते. आवश्यकतेनुसार लागवडी पद्धतीतही बदल करता येतो. त्यामुळे लागवडीनंतर साधारण तीन ते साडेतीन महिन्याच्या काळात उसाच्या सरीतील जागा पिकाशिवाय रिकामी राहते. उसाला दिलेली खते, पाण्याचा वापर करण्यासाठी आंतरपीक घेणे योग्य ठरते. उसासाठी सध्या खर्च अधिक येत असल्याचे सामध्ये आंतरपीक घेणे गरजेचे आहे. सुरुवातीचा ऊस लागवडीचा किमान खर्च तरी या आंतरपिकातून निघू शकतो. आंतरपीक अल्पावधीत काढणीस येते. त्याचा फायदा होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.