

बेळगाव ः गेल्या आठवडाभरापासून ड्रंक ॲन्ड ड्राईव्हवर कारवाई करणाऱ्या पोलिस खात्याने उद्या थर्टीफर्स्टला ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. विनासीटबेल्ट कार चालवल्यास अथवा दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसल्यास त्यांच्यावरही थेट कारवाई करण्याची सूचना पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली आहे. तसे पत्रक त्यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिले आहे.
थर्टीफर्स्टच्या बंदोबस्तासाठी पोलिस खात्याला विशेष सूचना केल्या आहेत. यासाठी एक हजारवर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यास संबंधिताला 10 हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची काळजी घेण्यात आली आहे. असा काही प्रकार घडल्यास रूग्णवाहिका अथवा अग्निशामक दलाच्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे सर्वांवर नजर राहणार आहेच. याशिवाय ड्रोन व पोलिसांकडे असलेल्या बॉडी कॅमेऱ्याद्वारेही सर्वत्र नजर ठेवली जाणार आहे.
एका दिवसात 31 जणांवर गुन्हे
गेल्या आठ दिवसांपासून ड्रंक ॲन्ड ड्राईव्हसंबंधीचे गुन्हे दाखल करणे सुरू आहे. 22 ते 28 या सात दिवसांत 107 जणांवर गुन्हे दाखल करून प्रत्येकाला 10 हजाराचा दंड आकारला आहे. सोमवार दि. 29 रोजी दिवसभरात 31 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.