

बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात मंगळवारी (दि. 1) अनोखा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या कुटुंबियांसाठी वचन गायन, भावगीते आणि कर्नाटकी संगीत कार्यक्रम झाला.
डॉक्टर्स डे निमित्त केएलई विद्यापीठ, केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि मेडिकल रिसर्च सेंटर आणि म्युझिक स्कूल यांनी मेलडी विरुद्ध मेलडी हा संगीतातून रोगमुक्तीपर कार्यक्रम आयोजित केला होता.
जेएनएम महाविद्यालय, बी. एम. कंकणवाडी, युएसएम आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयातील डॉक्टरांनी दीड तास गाणी गायली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, जुनी हिंदी चित्रपट गाणी आणि कन्नड चित्रपट गाणी अतिशय सुमधुरपणे गायली. डॉ राजेंद्र भांडणकर, डॉ. ए. एस. गोडी, डॉ. ज्योती नागमोती, डॉ. सदानंद पाटील, डॉ. बसवराज बिज्जरगी, डॉ. अरविंद तेनगी, डॉ. दीपक कर्णम, डॉ. प्रभाकर हेगडे, डॉ. मंजुनाथ शिवपूजीमठ, डॉ. पिटके, डॉ. हरपित कौर यांनी गायन केले. राहुल मंडोळकर, नितीन सुतार, यादवेंद्र पुजारी यांनी हार्मोनियम व तबला साथ दिली.
कार्यक्रमाला रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. (कर्नल) एम. दयानंद, डॉ. माधव प्रभू, डॉ. राजशेखर, संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य राजाराम अंबर्डेेकर आदी उपस्थित होते. संगीत महाविद्यालयाच्या डॉ. सुनीता पाटील यांनी स्वागत केले. डॉ. मनिषा भांडणकर व संगीत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. दुर्गा कामत यांनी आभार मानले.