

बेळगाव ः बेळगाव जिल्हा राज्यात सर्वात मोठा जिल्हा असून गोवा राज्याएवढी व्याप्ती आहे. त्यामुळे, या जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी आणि गोकाक जिल्हे तयार करा. तरच जिल्ह्याचा विकास शक्य होणार आहे, असे मत निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.
विधानसभेत बुधवारी (दि. 10) उत्तर कर्नाटकावर चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यावेळी आमदार जोल्ले यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन आणि विकास या विषयावर जोरदार मांडणी केली. कर्नाटकाच्या निर्मितीसाठी आणि त्याआधी ब्रिटिशांच्या विरोधातही बेळगाव जिल्ह्याने मोठे योगदान दिले आहे. कित्तूरची राणी चन्नम्मा यांनी सर्वात प्रथम ब्रिटिशांविरोधात लढा दिला. आता जिल्ह्यात 15 तालुके व 18 आमदार आहेत. तरी
जिल्हा विकासात खूप मागे आहे. शेजारील महाराष्ट्राच्या सीमेवर पंच तारांकित औद्योगिक वसाहत निर्माण करते. पण बेळगाव जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत. प्रशासकीयदृष्ट्या जिल्हा खूप मोठा असल्यामुळे चिकोडी आणि गोकाक असे वेगळे जिल्हे करण्यात यावेत. मोठे उद्योग येतील, यासाठी चालना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
उत्तर कर्नाटकात 24,980 सरकारी प्राथमिक शाळा, 5,556 सरकारी हायस्कूल, 457 पदवीपूर्व महाविद्यालये, 1,059 पदवी विद्यालये, 43 तांत्रिक महाविद्यालये आणि 873 प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आली आहेत. दक्षिण कर्नाटकाच्या तुलनेत ही आकडेवारी खूपच कमी आहे. त्यामुळे, या भागाचा विकास करण्यासाठी डॉ. नंजुडप्पा अहवालाप्रमाणे निधी देण्यात यावा, अशी मागणी आमदार जोल्ले यांनी केली.