

बेळगाव : मृत्यू दाखला हवा असेल तर मृत व्यक्तीच्या मृत्यूचे कारण देण्याची अट घातल्यामुळे आता हृदयाघाताने मृत्यू झाला तरी मृतदेहाचे विच्छेदन करावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे हृदयाघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अपघात व अनैसर्गिक कारणांनी मृत्यू झाल्यास शवविच्छेदन अनिवार्य असते. मात्र, आता अकस्मात किंवा हृदयाघाताने मृत्यू झाल्यानंतरही शवविच्छेदन करावे लागत असल्याने जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागावरील ताण वाढला आहे. त्यामुळे, मृताच्या नातेवाईकांना मृतदेह मिळण्यास विलंब होण्याचे प्रकार घडत आहेत.
गळफास, विषप्राशन, अपघात, विजेचा धक्का, सर्पदंश, बुडून मृत्यू किंवा इतर कारणाने मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करावेच लागते. मात्र, आता हृदयाघात किंवा इतर काही आजारांनी एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाचेही विच्छेदन करावे लागत आहे. त्याचा ताण आता जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागावर पडू लागला आहे. शवविच्छेदनासाठी बराच वेळ लागतो. जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात उत्तरीय तपासणीसाठी चार डॉक्टर आहेत. याठिकाणी सरासरी सात मृतदेहांचे विच्छेदन होते. मात्र, कधीकधी 10 ते 12 प्रकरणे येतात. अशावेळी मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे, मृताच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यासह जिल्हा रुग्णालयाचेही हेलपाटे मारावे लागत आहेत.
हृदयाघात किंवा अचानक फिटस् येऊन मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनाची काहीच गरज नाही. नातेवाईकांनाही शवविच्छेदन नको असते. मात्र, अलीकडे अशा घटनांत शवविच्छेदन करुन अहवाल दिल्याशिवाय मृत्यूची नोंद होत नाही. तसेच मृत्यू दाखलाही मिळत नाही. त्यामुळे, नाईलाजास्तव शवविच्छेदन करावे लागत आहे. बऱ्याचदा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी 12 ते 15 तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे, मृताच्या नातेवाईकांना ताटकळत थांबावे लागत आहे. प्रथम पोलिस ठाण्यात जाऊन त्याबाबत फिर्याद दाखल करावी लागते. त्यानंतर पोलिस पंचनामा करुन त्याबाबतचा अहवाल डॉक्टरांना देतात. त्यानंतर डॉक्टर आपल्या वेळेनुसार शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत आहेत.
बऱ्याचदा शवविच्छेदन करण्यासाठी काय करायचे असते, हे माहीत नसल्यामुळे नातेवाईकांना बरीच धावपळ करावी लागत आहे. परिणामी एखाद्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला तर नातेवाईक नोंद करुन शवविच्छेदन न करताच मृतदेह ताब्यात द्यावा अशी मागणी करत असतात. मात्र, डॉक्टर शवविच्छेदन करावेच लागेल असे सांगून मृतदेह विच्छेदनासाठी शवागाराकडे पाठवून देत आहेत. त्यानंतर नातेवाईकांना पोलिसांकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे नातेवाईकांना मोठा त्रास होत असून हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी होत आहे.
शेतात काम करत असताना पडून किंवा अन्य कारणांनी मृत्यू झाला, अपघात, सर्पदंश, विजेचा धक्का लागून मृत्यू झाला तर बऱ्याचदा नुकसान भरपाई वा विमा रक्कम मिळू शकते. नुकसान भरपाई हवी असेल तर शवविच्छेदन करणे गरजेचे आहे. कारण मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारकडून किंवा विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळू शकते. त्यासाठी शवविच्छेदनाची गरज आहे.