

बेळगाव ः महापालिकेत असलेल्या काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांचा मराठी द्वेष पुन्हा एकदा समोर आला. मरण उताऱ्याच्या अर्जात मराठीचाही समावेश करण्यात यावा, ही मागणी धुडकावून लावत सरकारी धोरणाप्रमाणे अर्ज देण्यात येतील, अशी पळवाट दोन्ही पक्षांनी काढली. त्यामुळे मराठी लोकांत संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या सभागृहात सोमवारी (दि. 12) सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. महापौर मंगेश पवार अध्यक्षस्थानी होते. दुपारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी मरण उतारा मिळवण्यात येत असलेल्या अडचणींचा विषय सभागृहात मांडला. त्यावेळी त्यांनी घरात मृत्यू झाल्यास पंचांची साक्ष, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, स्मशानभूमीतील नोंद या साऱ्या कागदपत्रांची सक्ती करण्यात येते. जर पंचांची साक्ष घेण्यात येत असेल तर डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येऊ नये. तसेच मरण उताऱ्यासाठी भरून द्यावा लागणारा अर्ज कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहे. त्यामुळे मराठी लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या दोन्ही भाषांबरोबरच मराठीचाही वापर यामध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली.
मराठी भाषेची मागणी करताच काँग्रेसचे सरकारनियुक्त सदस्य रमेश सोनटक्की यांनी, उताऱ्यासाठीचा अर्ज मराठीत देण्याची गरज नाही. सरकारी धोरणाप्रमाणेच भाषांचा वापर करावा, असे सांगितले. त्याला इतर नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे मराठीच्या मागणीवर सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी दूजाभाव दाखवला. या प्रकारामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे.