

बेळगाव ः दृष्टीहीन विद्यार्थी सहाय्यक लेखनिक घेऊन परीक्षा देत होते. मात्र आता शिक्षण खात्याने पहिल्यांदाच एक नवीन प्रयोग करण्याची योजना आखली आहे. शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने विद्यार्थ्यांना डिजिटल परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी ही परीक्षा फक्त सीबीएसई अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होती. मात्र आता राज्य अभ्यासक्रमातही ही परीक्षा पद्धत समाविष्ट करण्यात आली आहे. 2025-26 मध्ये? ? पीयूसी परीक्षेला बसणार्या विशेष दिव्यांग (दृष्टीहीन) विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून डिजिटल परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वर्षानुवर्षे सहाय्यकांच्या मदतीने परीक्षा द्याव्या लागणार्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना आता संगणक किंवा लॅपटॉप वापरून परीक्षा देता येणार आहे.डिजिटल परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्रांवर दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खोल्या असतील. डिजिटल परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या उपसंचालकांची परवानगी घ्यावी, असे बोर्डाने आदेश दिले आहेत. डिजिटल परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांना स्वतःचे लॅपटॉप किंवा संगणक आणावे लागतील.
डिजिटल परीक्षेदरम्यान टाइपिंगमध्ये समस्या असलेल्या विद्यार्थ्यांनाच टायपिंगसाठी सहाय्यक वापरण्याची परवानगी असेल. राज्यात एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांना आधीच डिजिटल परीक्षा देण्याची परवानगी होती. आता बोर्डाने पीयूसीला देखील डिजिटल परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.