

खानापूर : पश्चिम घाटासह तालुक्याच्या सर्वच भागात धुंवाधार पावसाने थैमान घातले आहे. सोमवारपासून (दि. 23) अव्याहतपणे कोसळणारा पाऊस मंगळवारीही (दि. 24) अविश्रांत बरसला. दिवसभरात कणकुंबीत सर्वाधिक 150 मिमी तर खानापूरमध्ये 130 मिमी पावसाची नोंद झाली.
संततधारेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अर्धा पश्चिम भाग अंधारात गडप झाला आहे. मलप्रभा नदीसह प्रमुख नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदी काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी रात्रीही पावसाची संततधार सुरुच होती. मंगळवारी दिवसभर पावसाच्या धुंवाधार सरी कोसळल्या. अपेक्षेप्रमाणे जांबोटी, कणकुंबी, शिरोली, हेमाडगा, लोंढा भागात पावसाचा जोर अधिक होता. हब्बनहट्टी-तोराळी मार्गावरील मलप्रभा नदीचा पूल काही काळ पाण्याखाली गेला होता. परिणामी बैलूर भागातील जनतेला पिरनवाडी मार्गे खानापूरचा प्रवास करावा लागला.
खानापूर अनमोड मार्गावरील मणतुर्गा गावाजवळील हालात्री नाल्याचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता होती. तथापि जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पुलात अडकलेली लाकडे आणि बुंधे तातडीने बाजूला काढण्याचे आदेश दिल्याने सध्यातरी या मार्गावरील रहदारी सुरळीत सुरु आहे. मंगळवारी रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
खानापूर-असोगा रस्त्यावर रेल्वे स्थानकानजीक भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी खोदाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणी तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. पाणी साचल्याने येथील रस्ता ढासळण्यास सुरुवात झाली आहे. येथे तातडीने कार्यवाही हाती घेतली नाही तर या मार्गावरील मन्सापूर, असोगा, भोसगाळी, मणतुर्गा या गावातील लोकांचा प्रवास बंद होण्याची शक्यता आहे.