

बेळगाव : जिल्ह्यात बेळगाव आणि चिकोडी असे दोन शैक्षणिक जिल्हे असले, तरी केवळ चिकोडीतच जवाहर नवोदय विद्यालय आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुशार मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. बेळगाव जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता एकच जवाहर नवोदय विद्यालय पुरेसे नाही. त्यामुळे बेळगावात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरु करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात सहावी ते बारावीच्या प्रतिभावान ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत, दर्जदार निवासी शिक्षण दिले जाते. जिल्ह्यात मुबलक सरकारी शाळा असूनही गरीब व मध्यमवर्गीय मुलांना उच्च शिक्षणाची दारे उघडण्यासाठी म्हणून एक नवोदय विद्यालयाची गरज आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात सुमारे 8.50 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 1,422 प्राथमिक आणि 559 माध्यमिक शाळा आहेत. त्यात सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचा समावेश असून एकूण 3,81,709 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 2,262 प्राथमिक व 643 माध्यमिक शाळा असून सुमारे 4,66,673 विद्यार्थी शिकत आहेत.
चिकोडी तालुक्यातील कोथळीत जिल्ह्यातील एकमेव जवाहर नवोदय विद्यालय असून त्यात मोफत सीबीएसई शिक्षण दिले जाते. याठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा असते. जिल्ह्यात अनेक खासगी सीबीएसई शाळा आहेत. मात्र, तिथे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण परवडत नाही. त्यामुळे, बेळगावात आणखी एका जवाहर नवोदय विद्यालयाची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील खासदार आणि राज्यसभा सदस्यांनी दुसरे नवोदय विद्यालय मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
गुलबर्ग्याला दोन, बेळगावला का नाही?
केंद्र सरकारची मूळ संकल्पना प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय आहे. मात्र, अनेक राज्यांनी या नियमाला अपवाद करत एकाच जिल्ह्यात दोन नवोदय विद्यालये सुरु केली आहेत. गुलबर्गा जिल्ह्यात दोन नवोदय विद्यालये आहेत. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची संख्या, भौगोलिक परिस्थिती पाहून गुलबर्ग्यात दोन नवोदय विद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्याच धर्तीवर बेळगावातही आणखी एक नवोदय विद्यालय सुरु करावे, अशी मागणी होत आहे.