

निपाणी : गांजाची आंतरराज्य तस्करी करणाऱ्या हुक्केरी तालुक्यातील सोलापूर येथील दोघा बांधकाम कामगारांना निपाणी शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी दुचाकीसह गजाआड केले. यावेळी पोलिसांनी 5.50 लाख रु. किमतीचा 10 किलो 610 ग्रॅम गांजा व दुचाकी असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बसवराज परशराम बजंत्री (वय 20) व इसाक मौला मदरखान (वय 20, रा. सोलापूर ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महामार्गावर राजस्थान धाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी महामार्गावर गस्त सुरू असताना कागल येथून संकेश्वरच्या दिशेने दोघे एका पोत्यातून काही वस्तू घेऊन जात असल्याचे गस्तीवरील पथकाला आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांचीही कसून चौकशी केली असता बांधकामाचे साहित्य घेऊन जात असल्याचे सांगितले. यावेळी पथकाला संशय आल्याने दोघांनाही स्थानकात आणून चौकशी केली असता पोत्यात गांजा आढळून आला. त्यानुसार दोघांवरही अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता दोघांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
सीपीआय बी. एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, फॉरेन्सिक लॅबचे सदाशिव कित्तूर, सहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. नरसपण्णावर, व्ही. एस. पुजारी, हवालदार उमेश माळगे, संजय काडगौडर, सुदर्शन अस्की, बसवराज नेर्ली, पी. एम. घस्ती, मंजुनाथ कल्याणी यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी निपाणी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.